माळशिरस : शहराजवळ पुणे-पंढरपूर महामार्गालगत घुले वस्ती येथे असणारी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक विहीर नव्याने होत असलेल्या महामार्गामुळे नष्ट होत आहे. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी विरोध करून पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला होता. याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा अनेक संघटनांनी दिला होता. याच अनुषंगाने पुरातत्व विभागाने रस्ते महामार्ग प्राधिकरणाला संबंधित विहिरीचे भूसंपादन क्षेत्रांमध्ये घेण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र दिल्यामुळे पुन्हा एकदा विहीर वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.
घुलेवस्ती येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीची निर्मिती केली. ही विहीर प्राचीन, ऐतिहासिक व उत्तम बांधकामाचा नमुना आहे. त्यामुळे ही विहीर प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडत असून, नव्याने होत असलेल्या पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९६५ या रस्त्याच्या रुंदीकरण कामांमध्ये नष्ट होऊ नये, असा प्राचीन वारसा जतन करण्यास आपले सहकार्य मिळावे, अशा आशयाचे पत्र सहायक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून २४ डिसेंबर रोजी रस्ते विकास प्राधिकरण व विहीर वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संस्थांना देण्यात आले आहे. ही बारव वाचविण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, रिपाइंचे विकास धाईंजे, दादासाहेब हुलगे, प्रा. सुभाष घुले, शरद कर्णवर, मैत्री प्रतिष्ठान, माउली ग्रुप, जय मल्हार युवा मंच, सुराज्य निर्माण ग्रुपसह परिसरातील तरुण व संस्थांनी निवेदन, पत्रव्यवहार केला होता.
आशा पल्लवीत झाल्या
राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. ही बारव नष्ट होण्याच्या मार्गावर होती. यासाठी विविध संस्था व व्यक्तींनी रस्ता बाजूने घ्यावा अथवा उड्डाणपुलाद्वारे रस्ता करावा, अशी मागणी यापूर्वी केली होती; मात्र याबाबत रस्ते विकास प्राधिकरणाचा कोणताही अजेंडा दिसत नव्हता. सध्या पुरातत्व विभागाने दिलेल्या या पत्रामुळे विहीर वाचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
फोटो ::::::::::::::::::::::::::::
घुले वस्ती (ता. माळशिरस) येथील ऐतिहासिक बारव.