विठ्ठल खेळगी, सोलापूर : सोलापूर शहरातील पान टपरीवर जीवघेणा ओला मावा, सुका मावा आणि कोरडा मावा विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे युवकांचे विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. मावा विक्री तत्काळ बंद करा अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना सोलापुरी मावा भेट देणार असल्याची माहिती सुहास कदम यांनी दिली.
सोलापुरात सर्रास मावा विक्री होत असल्यामुळे कमी वयातच कॅन्सर होणे, जबड्याचे विकार, स्कीनचे विकार होताना दिसून येत आहे. पान टपरी धारक मान्यता असल्यासारखे खुलेआम विक्री करीत आहेत. ओला मावामध्ये रेड बोला तंबाखू, एसटीडी नावाची तंबाखू, फरशीचा चुना, माव्याला कलर येण्यासाठी केमिकलयुक्त पिवळा कलर तसेच घाण पाणी वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कोरडा मावा व सुका मावा तयार करतानाही अनेक डुप्लिकेट तंबाखू वापरतात. अशा जीव घेणाऱ्या मावा विक्रीमुळे युवकांचे जबडे बारीक होत आहेत.
मागील दोन-तीन वर्षापासून मावा विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत शासन तत्काळ कठोर निर्णय न घेतल्यास तरुण पिढी वाया जाण्याची भीती निर्माण होत आहे. तत्काळ मावा विक्री बंद न केल्यास येणाऱ्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापुरी मावा भेट देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"