पंढरपूर : येथील निर्भया पथकाने कासेगाव येथील अल्पवयीन मुलीचा 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी होणारा बालविवाह रोखला. संबंधित बालिकेची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, कासेगाव (ता.पंढरपूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा कडलास (ता.सांगोला) येथील युवकाशी विवाह जुळविला गेला. हा विवाह सोहळा १४ फेब्रुवारी रोजी कडलास (ता. सांगोला) येथे बालविवाह होणार असल्याची माहिती निर्भया पथकाचे प्रमुख राजेंद्र गाडेकर यांना मिळाली. त्यानंतर गाडेकर यांनी पोलीस हवालदार अविनाश रोडगे, पोलीस कॉन्स्टेबल अरबाज खाटीक, गणेश इंगोले, कुसूम क्षीरसागर, निता डोकडे, चंदा निमंगरे यांचे पथक नेमून बालविवाहाची खात्री करवून घेतली. निर्भया पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पडताळणी केली. या चौकशीत मुलीगी अल्पवयीन असल्याचे समजले. त्या अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करून होणारा बालविवाह थांबविला. तसेच तिला येथील महिला व बालकल्याण समितीपुढे हजर करून तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
---
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील मुलिचा बालविवाह होणार असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली. बालविवाह होण्याच्या दोन दिवस आधी त्या बालिकेची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल विवाह विषयी माहिती मिळाल्यास निर्भया पथकाकडे तक्रार नोंदवावी.
- राजेंद्र गाडेकर
निर्भया पथक प्रमुख