सोलापूर : गावात कोरोनाचे बालंट, शेतात दररोज वादळ- वारे अन् वीज- पावसाचे संकट, त्यातच संचारबंदीच्या दहशतीने शेतीमाल व दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या सर्व बाजूंनी पंचायत झाली आहे. काय करावे अन् कसे दिवस काढावे, असे चित्र गावागावात दिसू लागले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना काही केल्या थांबायला तयार नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसाऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. वरचेवर सर्वच लोक भयभीत होऊ लागले आहेत. गावोगावी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. किमान नातेवाइकांना कोरोनाने गाठल्याने चिंता वाढली आहे. गावात कोरोनाची भीती वाढत असताना आठवडाभरापासून दररोज वादळ- वारे व विजाच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत आहे.
ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष जागेवर आहेत त्यांना धडकी भरू लागली आहे.
त्यातच शेतीमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचे प्रमाण वरचे वर वाढत असल्याने लाॅकडाऊन लावावा लागेल, असे वारंवार मुख्यमंत्री सांगत आहेत. त्याचाही मोठा परिणाम शेतीमालाच्या दरावर झाला आहे. त्यातच मार्च व एप्रिल महिन्यात दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वरचे वर वाढ होत आहे.
---
कडबा काळवंडतोय
ज्वारी, गहू काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने मागेल तेवढे पैसे किंवा ज्वारी द्यावी लागत आहे. यातच पावसाचे थेंब पडल्याने कडबा काळा पडू लागला आहे. कांदा, वांगी, टोमॅटोला व अन्य शेतीमालाला
भाव नसल्याने केलेला खर्चही निघेना झाला आहे.