सोलापूर : सांगोला शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ नंतर वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसात वीज कोसळून लिगाडेवाडीत एका म्हशीचा मृत्यू झाला तर सोनलवाडीत कडब्याची गंजी जळून खाक झाली.
सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावात तासभर दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंड हावेचा दिलासा दिला.
दरम्यान या अवकाळी पावसात सोनलवाडी येथील शेतकरी गजेंद्र मधुकर खरात यांच्या घराशेजारील कडब्याच्या गंजीवर वीज पडून दोन हजार कडब्याची गंज जळून खाक झाली. मात्र सुदैवाने जनावरे व घरातील माणसे बचावली. अजनाळे- लिगाडेवाडी (शिंदे वस्ती) येथील शेतकरी अजित काकासाहेब शिंदे यांच्या घरासमोर बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला.
मागील आठवड्यापासून सांगोला तालुक्यात वातावरणातील बदलामुळे दुपारनंतर वादळी वारे वाहिले. पाडाला आलेल्या केशर, बदाम, गावरान आंबा फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे कडब्याच्या गंजी भिजल्यापे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात कडब्याच्या गंजीवर वीज पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.