नरखेड : भोयरे (ता. मोहोळ) येथे श्री जगदंबा देवीच्या पुजाºयांनी परवानगी देताच सुरू झाली तुफान दगडफेक अन् पुन्हा बंदचा इशारा देताच दोन्ही गटातून दगडफेक बंद झाली़ जगदंबा देवी मंदिरासमोर हा दगडफेकीचा खेळ पार पडला. हा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.
धुलीवंदन दिवशी भोयरे येथे भाविक श्री जगदंबा देवी मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने गेले़ त्यानंतर नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या पार पडल्या़ सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगड फेकले, नंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले़ एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा राहिला.
पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. या दोन्ही गटामधील अंतर केवळ १५० ते २०० फूट आहे़ साधारणत: हा खेळ २० मिनिटे चालू राहिला. अखेर पुजाºयांनी खेळ बंदचा इशारा करताच दोन्हीही गट दगड फेकण्याचे थांबविले़ नंतर सर्वच भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
या दगडफेकीच्या खेळामध्ये काही भाविक जखमी झाले़ पण ते कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी गेले नाहीत तर मंदिरात जाऊन त्या जखमेवर देवीचा अंगारा लावला की जखम बरी होते, असे अनेक भाविकांनी सांगितले.
मनात द्वेष, रोष न ठेवता दगडफेक - भोयरेतील दगडफेकीच्या या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही नियम व अटी नाहीत. याचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणारे दोन्हीही गट कोणतेही राजकीय गटाचे नसतात. सहभागी भाविक मनात कोणताही राग, द्वेष, शत्रुत्व न ठेवता दगडफेक करतात़ याचे महत्त्व म्हणजे पायथ्याच्या गटाचा दगड केवळ धुलीवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत जातात़ अन्यवेळी जात नाहीत, अशी आख्यायिका असल्याचे भोयरे ग्रामस्थ सांगतात़ यासाठी सूरज साठे, भैय्या पवार, उमेश ताकमोगे, नागेश थोरबोले यांनी परिश्रम घेतले़