पंढरपूर/ंसांगोला : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात आज (सोमवारी) पुन्हा वादळी वार्यासह पाऊस झाल्याने सर्व त्र हाहाकार उडाला. पंढरपूर तालुक्यातील खडसोळीत वीज अंगावर पडल्याने हेमा उत्तम जगताप (वय- ११) या बालिकेचा तर सांगोला तालुक्यातील किडबिसरीत घरावरील पत्रे उडाल्याने लोखंडी अँगल अंगावर पडल्याने रत्नाबाई श्यामराव देवकते या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय दोन्ही तालुक्यात तीन जनावरे दगावली तर चारजण जखमी झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंढरपूर तालुक्यात २६ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या वादळी वार्यासह पावसाचा कहर अद्यापपर्यंत कायम असल्याने शेतकर्यांसह सगळेच भयभीत झाले आहेत. पंढरपूर—सांगोला रस्त्यावरील एका नारळाच्या झाडावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सुस्ते येथे एका म्हशीवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली तर खडसोळीतही वीज अंगावर पडल्याने हेमा उत्तम जगताप (वय ११) या बालिकेचा बळी गेला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुस्ते, तारापूर, मगरवाडी या भागात गारपिटीने कहर केला होता. वादळीवार्याने घरांवरील पत्रे उडून गेल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर पडले होते. दरम्यान पुन्हा दुसर्यांदा अवकाळीचा तडाखा बसल्याने पटवर्धन कुरोली, शेळवे, खेडभोसे, देवळे, गुरसाळे या भागात शेतीबरोबर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. पुळूजमध्ये पत्र्यांच्या दांडक्याला अडकविलेला पाळणा उडून गेल्याने एक चिमुरडी जखमी झाली होती तर गुरसाळेत एका मुलाचा मृत्यू झाला होता. खरसोळी (ता. पंढरपूर) येथील हेमा उत्तम जगताप (वय ११) ही भर दुपारी आईला जेवणाचा डबा घेऊ जात असताना सुटलेल्या वादळ वार्यात पडलेल्या वीजेने भाजून जखमी झाली. तिला उपचारासाठी पंढरपुरात आणत असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी खरसोळी हद्दीत घडली. सांगोला तालुक्यातील घेरडी परिसरास सोमवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीच्या पावसाने फटका बसला.
---------------------------
अँगल डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू
किडबिसरी, देवकाते वस्ती येथील शामराव देवकाते यांच्या घरावरील पत्रे उडून झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल डोक्यात पडल्याने रत्नाबाई श्यामराव देवकते या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. शारदा यशवंत घेरडे व प्रकाश भीमराव कोळेकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भागात वादळी वार्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे शिवाजी घेरडे यांनी सांगितले. सुस्तेत वीज पडून म्हैस दगावली सोमवारी दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला सायंकाळच्या गारव्याने दिलासा दिला. मात्र पुन्हा कहर करीत मगरवाडी परिसरात तासभर गारपीट झाल्याने पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकरी हबकून गेला आहे. वादळीवार्यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज गायब झाली . सुस्ते (ता. पंढरपूर) येथील बाबासाहेब अप्पाराव करपे यांच्या म्हैसवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली. तालुक्यात सर्वदूर वादळाचा जोर होता.