सोलापूर : जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांना वादळी वाऱ्याने शनिवारी सायंकाळी तडाखा दिला. तसेच त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री हवेत गारवा निर्माण झाला. मात्र या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कुठे फारसे नुकसान झालेले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत गेली. शनिवारी सकाळी उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारी मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावण निर्माण झाले. सायंकाळी सात वाजता वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. जवळपास तासभर वारे वाहत होते. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही गावांत घरांवरील पत्रे उडाली. हीच स्थिती माढेकरांनी अनुभवली. माढ्यात महतपूर येथे झाडं उन्मळून पडली. सांगोल्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, जवळपास १५ मिनिटे पावसाची सरी कोसळत राहिल्या. यानंतर उकाडा हा कमी झाला.
माेहोळमध्येही सायंकाळीर साडेसात वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. यानंतर मोहोळ शहरात वीज गायब झाली. रात्री उशिरापर्यंत वीज आलेली नव्हती. ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. लांबोटी, शिरापूर, भांबेवाडी, हिंगणी, भोयरे या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
मोहोळप्रमाणेच पंढरपूर तालुक्याला वादळी वाऱ्याला पावसाने झोडपून काढले. बार्शीत मात्र दिवसभर उकाडा जाणवला.
----
अक्कलकोटमध्ये पत्रे उडाले
अक्कलकोट तालुक्यात सायंकाही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वागदरी, चपळगाव, बऱ्हाणपूर, हन्नूर, सातन दुधनीसह तडवळ परिसरातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट शहरात वादळी वाऱ्यामुळे थडगी मळा येथे तीन झाडं उन्मळून पडली. तसेच काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने संबंधित कुटुंबांची धांदल उडाली. रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती.