दक्षिण सोलापूर: सीना नदीत उजनीतील पाणी सोडून १६ बंधारे भरुन घेण्याच्या मागणीसाठी सीना नदी पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आवारात आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यापूर्वी ३ एप्रिल रोजी सोडलेले पाणी आठवडाभरात संपल्याने सीना नदीकाठचे बंधारे कोरडे पडले आहेत. सध्या पिके करपत असल्याने संतप्त शेतकर्यांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी वडकबाळ येथे एकत्र आले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. विलास लोकरे, शिवानंद वरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये ठिय्या मांडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तेथे आले आणि त्यांनी पाठिंब्यासाठी पोर्चमध्ये ठिय्या मारला. तासाभराने शेतकरी जलसंपदा कार्यालयाकडे गेले. अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. यावेळी अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील तेथे धावून आले. त्यांनी शेतकर्यांशी चर्चा केली. जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्याशी मोबाईलवरुन स्थितीची माहिती दिली आणि सीनेत पाणी सोडण्याची मागणी केली. अधिकार्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.