सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना भीती असते.
नेहमीप्रमाणे सराफांच्या दुकानी बसलो असताना साठी पार केलेले, दोन महिने दवाखान्यात राहून कोरोनाला हरवलेले, मरणाच्या दारातून परतलेले आबा दुकानी येताच शेठजींनी त्यांचे स्वागत केले. आम्हाला तुमची खूप आठवण होत होती, असं शेठजी आप्पा म्हणताच आबा बोलू लागले. या जगात कोणी कोणाचं नाही आप्पा, स्वतःची माझी पत्नीही मला कोरोना झाला असे समजताच दवाखान्यात आली नाही. डॉक्टररूपी देवाच्या आशीर्वादानं जिवंत आहे, काही तत्त्वज्ञान सांगू नका, असे आबा बोलत होते. असो. माझी कुणाकडेच तक्रार नाही. तेवढ्या पाटलिणीच्या पाटल्या करा लवकर म्हणजे झालं, शब्दातून सुटलो. पुन्हा पोस्ट कोविड, बोविड झाला तर निघायला बरं. पाटील सहजपणे बोलत होते. बाजूला बसून पाटलांची सहज स्थितप्रज्ञता मी अनुभवत होतो.
अतिशय साधी राहणी, मुखात रसाळ लोकवाणी पाहून आबांच्या मध्यम परिस्थितीपेक्षा समृद्ध मनस्थितीचा अंदाज येत होता. जेमतेम जुनी चौथी शिक्षण बघितले की, केवळ शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा अहंकार गळून पडत होता. कोणतेही पद नसताना आबांची समाजातील पत ऐकताना मानवी मूल्यांची सार्थकता अजूनही टिकून आहे हा सकारात्मक विचार दृढ होत होता. आनंदी रहायचेच असेल तर फक्त आपलं कर्म आनंदाने करत राहिलं की, माणूस आनंदीच राहतो इतकं साधं तत्त्वज्ञान अनुकरणीय होतं.
नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एक रे प्राण्या, माझे माझे म्हणूनी, हा संतविचार आणि आबांनी अनुभवलेला जीवनातील दाहक वास्तव आचार यांची सांगड घालत होतो. कधीही आळंदीची वारी न करणारे आबा माऊलींच्या आळंदीच्या मंदिरातील हे मी केले, ते मी केले. गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून जाईल प्रभुलीला तू विसरू नको हे वाक्य तंतोतंत आचरणात आणत होते. कठीण काळात आबांसाठी कोणाचंही नसलेलं ममत्व अशा काळातच आबांचं सर्वांसाठी असलेलं समत्व लक्षणीय होतं.
ग्रामीण भागातील साधा वेश आणि प्रांजळ आवेश असणारी अशी माणसं पाहिली, ऐकली, अनुभवली की माझा भारत देश महान का आहे
हे सांगावं लागत नाही. छोट्या गोष्टीतील हे अनमोल, अमर मोठेपण अभंग आणि अथांग आहे. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता, मूल्ये ही शब्दांच्याही पलीकडील असतात आणि हे सगळं मानव जातीसाठी असतात. जेव्हा अशी मानवजात मरणाच्याही पलीकडील माणूसपण सिद्ध करते तेव्हा ओठावर आपोआप शब्द येतात, किती सुंदर, सुंदर हे जग ज्याने निर्मियले. त्या परमेशाला रे, वाहू या.. शब्दफुले.
- रंगनाथ काकडे, वैराग (लेखक अध्यात्म क्षेत्रात कार्यरत आहेत)
95 52 47 28 09