शिवानंद फुलारी
अक्कलकोट : स्ट्रॉबेरी हे फळ थंड प्रदेशातील. या फळाची आपल्याकडे आजवर आयातच झालेली, मात्र हे फळ आता सोलापूरसारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशातही पिकायला लागले आहे. अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी शिवारातील प्रगतिशील शेतकरी रमजान सैपन हजाणे यांनी अर्धा एकरात स्ट्रॉबेरीची फळबाग फुलवून शेतकºयांना नवी दिशा दाखविली आहे.
अक्कलकोट तालुका तसा अवर्षण दुष्काळी पट्टा. कमी सिंचनाची सोय असलेल्या या भागात शावळसारख्या ग्रामीण भागात व्यवसायाने गवंडी असणारे शेतकरी रमजान हजाणे यांनी ही किमया साधली आहे. महाबळेश्वर येथील एका बंगल्यासमोरील शेतात असलेल्या स्ट्रॉबेरीची बाग त्यांनी पाहिली. तेव्हापासून आपणही अशी बाग फुलवावी, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. परतल्यावर ते कामी लागले. गावात पाण्याची कमतरता असतानाही टँकरने पाण्याची व्यवस्था करून त्यांनी ही बाग उभी केली. पहिल्याच वर्षी केवळ अर्ध्या एकरात अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन त्यांनी यशस्वी पाऊल टाकले. स्ट्रॉबेरी बागा केवळ थंड हवेच्या प्रदेशातच असू शकतात, हा समजही पुसून काढला. या टवटवित बागेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
या मालाला बाहेरील बाजारपेठेपेक्षा स्थानिक बाजारपेठ परवडते. कारण, वाहतूक खर्च आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे असते. या फळाला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
अशी आहे लागवडीची पद्धतत्यांनी पहिल्यांदा महाबळेश्वर येथून प्रत्येकी १२ रुपये प्रमाणे ११ हजार रोपे आणून मध्यभागी ड्रीप करून एक फूट बाय एक फूट अंतरामध्ये चार रोपे बसतील, अशा पद्धतीने आॅक्टोबर महिन्यात लागवड केली. दोन महिन्यांत फळे येऊन साधारणत: मार्च महिन्यापर्यंत सीझन चालतो. यावर्षी त्यांनी स्वत: रोपे तयार करून लावली. लागवडीनंतर वीस दिवसांनी मल्चिंग पेपरला ब्लेडने छिद्र पाडून रोपांचे पोषण करावे लागते. झाडाची उंची केवळ एक ते सव्वा फूट असली तरी व्यास चांगला असतो.