संताजी शिंदे, सोलापूर: सत्ताधारी पक्षातील नेते शासकीय रूग्णालयात आलेल्या रूग्णांची सेवा न करता, स्वत:च्या नावाने महाआरोग्य शिबीर आयोजित करीत आहेत. हा प्रकार निंदनीय असून, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) रूग्णांना सुरळीत सेवा द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रूग्णालयाच्या अधिष्ठाता सुधीर देेशमुख यांच्याकडे करण्यात आली.
शासकीय रूग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची सेवा होण्या ऐवजी त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसून येत आहे. रूग्णालयात रूग्ण बरा होण्यापेक्षा त्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. सत्तेचा तोरा करीत राजकीय मंडळी शहरात जागोजागी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करीत आहेत. शिबीरामध्ये शासकीय यंत्रणेचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या प्रकारामुळे रूग्णालयातील रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार निंदनीय असून तो थांबला पाहिजे. अंतर रूग्णावर व बाह्यरूग्णावर होणाऱ्या अडचणी त्वरीत दूर कराव्यात अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्यासह ठाकरे सेनेचे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.