सोलापूर : कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाºयांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदार व अकार्यक्षम कर्मचाºयांंविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अखंडित वीजपुरवठा, बिलिंगबाबतचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले.
राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या आदेशान्वये वेबिनारव्दारे उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. यात सोलापूर जिल्ह्यातील चिंचोलीकाटी, अक्कलकोट रोड, टेंभुर्णी एमआयडीसी व इतर भागातील १६० उद्योजक व महत्त्वाचे मोठे ग्राहक सहभागी झाले होते.
यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पॉवरलूम फेडरेशनचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष केशव रेड्डी, सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी अखिल बिटे व इतर प्रतिनिधी, रुग्णालये प्रतिनिधी समीर इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी उद्योजकांनी वीजपुरवठा व बिलींगबाबत विविध प्रश्न, अडचणी व समस्यांचा प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी जागेवरच आढावा घेतला व त्याच्या निराकरणासाठी अधिकाºयांना विविध उपाययोजनांचे आदेश दिले.
या वेबिनारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी व उद्योग परिसरात विविध योजनांमधून झालेली व प्रस्तावित वीजयंत्रणांची कामे आदींसह नवीन वीजदर निश्चितीकरणात उद्योगांसाठी असणारी सवलत, स्वतंत्र वेबपोर्टल, विविध ग्राहकसेवा आदींची सादरीकरणातून माहिती देण्यात आली. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील उद्योगांचे संचालक, प्रतिनिधी आदींसह महावितरणचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते.