आ. भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. यानंतर सहा महिन्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. यामध्ये भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा मोठ्या पक्षांसह इतर संघटनांनीही उमेदवार दिला होता. यामुळे ४ एप्रिलपासून पंढरपूर-मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री, दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या सभा झाल्या. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील नागरिक प्रचारासाठी ठाण मांडून बसले होते. निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक सभेला हजारोंची गर्दी झाली होती. यामुळे निवडणुकीनंतर अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.
निवडणूक लागण्यापूर्वी पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आढळून येत होती. मात्र निवडणूक झाल्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. यामुळे अधिक बिकट प्रकृती असलेले रुग्ण इतर जिल्ह्यात, शहरात उपचार मिळवण्यासाठी जात आहेत. तर अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.
२ मे रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी व निकाल लागणार आहे. यामुळे पंढरपुरात अधिक गर्दी होऊ शकते. यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाचा अधिक प्रसार होऊ शकतो. यामुळे मतमोजणी दरम्यान पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गर्दी टाळण्यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त
पंढरपूर येथे कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहेत. मतमोजणी दिवशी फक्त उमेदवारासह प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. अन्य लोकांनी रस्त्यावर फिरू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर पंढरपुरात वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये ५ अधिकारी, ३० कर्मचारी व सीआरपीएफच्या पथकाचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी १४ टेबल
कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याकारणाने फक्त १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी उमेदवाराच्या १४ प्रतिनिधीना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर मतमोजणी सुरू असलेल्या परिसरात २०० मीटरच्या आसपास नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
असे वाढत गेले कोरोना रुग्ण
३ एप्रिलला ९८ रुग्ण, ४ एप्रिलला ७५ रुग्ण, ५ एप्रिलला १०४ रुग्ण, ६ एप्रिलला १०३ रुग्ण, ७ एप्रिलला १२४ रुग्ण, ८ एप्रिलला १४१ रुग्ण, ९ एप्रिलला १५१ रुग्ण, १० एप्रिलला २१५ रुग्ण, ११ एप्रिलला ८२ रुग्ण, १२ एप्रिलला २४४ रुग्ण, १३ एप्रिलला ११५ रुग्ण, १४ एप्रिलला १४१ रुग्ण, १५ एप्रिलला ३४० रुग्ण, १६ एप्रिलला २५५ रुग्ण, १७ एप्रिलला २४६ रुग्ण, १८ एप्रिलला १११ रुग्ण, १९ एप्रिलला २९४ रुग्ण, २० एप्रिलला ३५९ रुग्ण, २१ एप्रिलला २१४ रुग्ण, २२ एप्रिलला ३७५ रुग्ण, २३ एप्रिलला ३७८ रुग्ण, २४ एप्रिलला ५०२ रुग्ण, २५ एप्रिलला २२२ रुग्ण, २६ एप्रिलला ४३५ रुग्ण.