शासकीय तसेच खासगी दवाखान्यांची चांगली सोय, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, बँक, खत दुकाने व बाजारपेठेची सोय वडाळा गावात आहे. यामुळे उत्तर तालुक्यातील रानमसले, वांगी, पडसाळी, गावडीदारफळ, कळमण, नान्नज तसेच मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील बोबडेवाडी, केमवाडी, सावरगाव, काटी, शेळगाव (बार्शी), मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर, चौधरीमसले या गावातील नागरिक व विद्यार्थ्यांचा वडाळा गावात नेहमीच वावर असतो. दररोज तपासणी होत असल्याने वडाळा गावातील पाॅझिटिव्हची संख्या तालुक्यात सर्वाधिक २४५ इतकी असली, तरी मृत्यू मात्र अवघे तीन झाले आहेत. यामध्ये पहिल्या लाटेत दोन, तर दुस-या लाटेत एकाचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्यसेविका विद्या टेकाडे यांनी सांगितले.
----
कोरोना तपासणीशिवाय नाही उपचार
२०११ च्या जनगणनेनुसार ५,१४४ लोकसंख्येच्या गावात ग्रामीण रुग्णालय तसेच दोन मोठे खासगी दवाखाने आहेत. पहिल्या लाटेने दोघांचा मृत्यू झाल्याने दुसऱ्या लाटेत फार काळजी घेण्यात आली. गावात फवारणी, सॅनिटायझरचा, मास्कचा वापर तसेच रिकामी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. याशिवाय सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला व इतर विक्रेत्यांना शासनाने ठरवून दिल्यापेक्षा अधिक नियमांचा गावपातळीवर अंमल केला जात आहे. डाॅक्टर कोरोनासदृश असलेल्यांवर कोरोना तपासणी केल्याशिवाय उपचार करीत नाहीत.
---
पहिल्या लाटेत दोघांचा मृत्यू झाल्याने दुसऱ्या लाटेत दक्षता घेतली. तरीही एप्रिल महिन्यात एकाचा मृत्यू झाला. घरोघरी जनजागृतीचा अंमल केला जातो. गावात कोणी विनामास्कचा दिसणार नाही.
- बळीरामकाका साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
--