बार्शी शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, तसेच ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व लसींचा असलेला तुटवडा पाहून सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांच्याशी विचारविनिमय करून,बार्शी शहर तालुक्यात किराणा दुकानासह सर्व उद्योग, बाजार समिती, भाजी मंडई बंद ठेऊन कडक लॉक डाऊन करण्यावर एकमत झाले. ही अंमलबजावणी मंगळवारी रात्रीपासून करण्यात येत असल्याचे आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, गटविकास अधिकारी शेखर सावंत, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका पोलीस स्टेशनचे शिवाजी जायपात्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.
बार्शीत सुसज्ज यंत्रणा असताना रुग्णसंख्या वाढत आहे. पाच दिवसात केवळ २० रेमडेसिविर मिळाली आहेत. ऑक्सिजन चा तुटवडा आहे. लस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. पैसा हा गौण आहे, उद्योगधंदेही पुन्हा सुरू होतील. पण उपचारासाठी जीव जाणे हे पाहवत नाही. त्यामुळे आपण दहा दिवस सर्व व्यवहार बंद ठेवावेत. लॉकडाऊन नाही पाळला तर दहा दिवसाने काय अवस्था होईल. याचा विचार करवत नाही, असे आ. राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले की, परिस्थिती विदारक आहे. माणसांचे जीव वाचवणे काळाची गरज आहे. प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत स्थानिक प्रशासनाला दिलेल्या अधिकारातून निर्णय घेऊन आदेश पारित करावे. बेड मिळत नसल्यामुळे लोक पॅनिक झाले आहेत. या काळात तपासण्या वाढवाव्यात. हा लॉकडाऊन म्हणजे बार्शीकरांनी बार्शीकरांसाठी घेतलेला निर्णय आहे. यावेळी अजित कुंकुलोळ व काही नगरसेवकांनी सूचना केल्या.
----
भाजीपाला फिरुन विक्रीस मान्यता
या दहा दिवसांत भाजीपाला आणि फळे गावात फिरून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही उद्योग सुरु राहणार नाही. बाजार समिती बंद राहील. शेतीपूरक सर्व आस्थापना बंद राहतील. सर्वसामान्यासाठी पेट्रोल पंप ११ वाजेपर्यंत सुरू राहतील.
----