- अरुण बारसकर सोलापूर : खासगी दूध संघांनी शासन आदेशापेक्षा कमी दर देण्याबाबतचे दरपत्रक दूध संकलन केंद्रांना दिले आहे. यात ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दुधाला २२ रुपये १० पैसे दर दर देण्यात येईल, असे म्हटले आहे. तत्पूर्वी शासन आदेशात २४ रुपये १० पैसे दर देण्यात येईल असे जाहीर केले होते.राज्यात गाईच्या दुधाचा दर १७ रुपयांवर आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर २१ जुलैपासून दर वाढ देण्याचे जाहीर केले होते. खासगी संघांनी काही मुद्दे पुढे करीत दर वाढीची अडचण सांगितली व एक आॅगस्टपासून दरवाढ देण्याचे मान्य केले. याप्रमाणे शासनाने मुख्यमंत्री व सचिवांच्या बैठकीचा संदर्भ देत ३१ जुलै रोजी नवा आदेश काढला.यामध्ये १९ रुपये १० पैसे दूध संघाचे, ५ रुपये शासन अनुदान असे २४ रुपये १० पैसे दूध उत्पादकांना प्रति लिटर मिळणार होते. मात्र, खासगी संघांनी काढलेल्या नवीन दरपत्रकात ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दुधाला १७ रुपये १० पैसे दर देणार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाºया दरातून दोन रुपये व शासनाकडून प्रति लिटर ५ रुपये असे खासगी संघांना प्रति लिटर ७ रुपये मिळणार आहेत.पावडर प्रति किलो १६० रुपयेदूध पावडरीचे दर १४० रुपये किलो इतके खाली आल्याचे खासगी संघांनी मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत सांगितले होते. एक आॅगस्ट रोजी पावडरीचे दर प्रति किलो १० रुपये व पुन्हा १० रुपयाने वाढले. आता दूध पावडरीचा दर प्रति किलो १६० रुपये असल्याचे सांगण्यात आले. शासन आदेशात फॅट स्टँंडर्डपेक्षा कमी व अधिक प्रति एक पॉर्इंटला ३० पैसे देण्यात येतील असे नमूद केले असताना खासगी संघांच्या दरपत्रकात १० पैसे दिली जाईल असे म्हटले आहे.खासगी संघांनी काढलेले दरपत्रक सर्वांना अडचणीत आणणारे आहे. या दरानेच आमचे शिल्लक दूध घेणार असतील तर आम्ही शेतकºयांना २५ रुपयाचा दर देऊ शकणार नाही.- आ. प्रशांत परिचारक, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ.
खासगी दूध संघाचा शासन आदेशाला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:11 AM