सोलापूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (19 जुलै) अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन वारीच्या काळात मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर समितीच्या एका सदस्याने समितीच्याच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या सदस्याने आणलेले लोक दर्शनास सोडण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या सदस्याने समितीच्या ४ ते ५ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.
'येथे बसू नका, मंदिराच्या बाहेर निघून जा', अशी तंबी देत गोंधळ घातल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व कर्मचारी मंदिरातील सभा मंडपात एकत्र आले आणि संबंधीत सदस्यविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, ऐन यात्रेच्या काळात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे मंदिरात गोंधळ उडाला आहे.