विलास जळकोटकर
(तमाशाचा फड... कनातीत गर्दी उसळलीय... अजून पडदा उघडलेला नाही... प्रेक्षकांतून शिट्ट्यांचा आवाज... टांगटिंंग टिंंग टिंंग टिंंग टिंंग टिंंगाऽऽ नादनिंग नादनिंग नादनिंंग नादनिंंगच्या सुरावटीनं ढोलकीनं ताल धरला... अन् पडदा उघडताच प्रेक्षकांतून जोरदार शिट्ट्या आणि डोक्यावरच्या टोप्या, रुमाल आभाळात उडाले... नटराजाचे पूजन झाले अन् ढोलकीच्या कडकडाटातच घुंगरांचा छनछनाट करीत लावण्यवती नृत्यांगनांचे आगमन झाले...)
- छाया: (प्रेक्षकांकडं पाहत) बया बयाऽ बयाऽऽ अक्का ! किती मोठ्ठी गर्दी गं.
- माया: अगं, हे आपले रसिक मायबाप हाईती. ‘कलेचे कलंदर, मुलखाचे बिलंदर, कधी फिरंल कळत नाय, बग ह्यंचं चलिंंतर’
- छाया: अक्का, तू बी कवापास्न कवनं रचायला शिकलीच गं.
- माया: अगं, याला आपल्या लोककलेचे पूजक अनंत फंदी ह्यंच्या भाषेत फटका म्हणत्यात.
- छाया: आता गं बया ! फटक्यावरून आठविलं बग. अक्का, निवडणुकीच्या गोंधळात लई फटकेबाजी सुरू हाय म्हन.
- माया: व्हय बया ह्यंचं हेच चालणार की. गल्लीत चार माणसं न पुसणाºया लोकांनाही चेव चढलाय.
- छाया: गल्लीतलं काय घिवून बसलीच. मंबई, दिल्लीतूनबी काय थोडी फटकेबाजी सुराय व्हय. आता परवाचंच बग की, जाणत्या राजानं भगवंत नगरीतल्या सभेत थाळीवरनं ‘वाघ’ साह्यबांचा चिमटा काढला
- माया: अगं, काल त्याच नगरीत ‘वाघ’ सायबानंबी एक रुपयात डोकं तपासाचा उतारा दिला की बाई.
- सूत्रधार: (दोघींना एकदम) छाया-माया, आता तुमचं बास्स कराकी बयानू. लोकं किती येळ ताटकळून बसल्यात.
- छाया-माया: व्हय की वो पावणं. मग, आता इलेक्शनचं वारं भिरभिरतंय तवा आपुनबी (समोरच्या रसिक प्रेक्षकांकडं पाहत) ह्यंच्यासाठी पायजेल ती फर्माईश सादर करू.
- छाया-माया: ( घुंगराच्या छनछनाटात लावणी सुरू होते)
- लई दिसानं मर्जी फिरली गं , पाच वर्षात वाट नाही घावली
- भोळ्या जनतेची वाट ह्यंनी लावली गं, मतदारांचं बारसं हे जेवली
- कोरस: जीजी रं ऽ जीजी रंऽऽ जी जी जीऽऽ (कोरस)
- (लावणी संपते आणि सूत्रधाराचं रंगमंचावर आगमन होतं.)
- शाहीर: (प्रेक्षकांकडं पाहत) राम राम मंडळी.. बराय नव्हं. इलेक्शनचा घोडा चौखुर उधळलाय.
- छाया: उधळणारच की, साधी गोष्ट कळत नाह्य काय?
- शाहीर: मला कळतंय वोे बाई ! पण, इलेक्शनमध्ये उभे राहिलेल्यांना कळलं पाहिजे ना!
- माया: काय कळलं पाईजे ?
- शाहीर: गल्लीत गोंधळ आन् मुंबई-दिल्लीत मुजरा. जनतेच्या नावानं बोंब. असलं बिनकामाचं तण काढाय पाहिजे.
- माया: शाहीर तण म्हणजे काय हो ?
- शाहीर: बाई ! भरल्या पिकात गवत वाढलं तर का व्हईल?
- छाया: काय व्हईल म्हंजी. पिकाचा नुसता बट्ट्याच व्हईल की.
- शाहीर: बाई तुमी समजूतदार हाव. पण, ज्याला समजाय पाहिजी त्यंनला समजलं पाहिजी की.
- छाया-माया: (एका सुरात) हे मात्र खरं हाय शाहीर.
- शाहीर: रसिक मायबापहो... जिल्ह्यात घुरदाळा चालू द्या... आश्वासनं देतील ती ऐकून घ्या अन् स्वत:च मनी ठरवा बिनकामी तण काढून टाकायचं का ठेवायचं...
- छाया-माया: शाहीर मानलं बाई तुम्हाला. (प्रेक्षकांकडं पाहत) मंडळी आता तरी शानी व्हा. म्हणत प्रेक्षकांना अभिवादन करतात आणि रंगमंचावरचा पडदा पडतो.