सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. प्रचार संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून गैरकृत्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना निवडणूक आयोगाच्या पोलीस निरीक्षक विभू राज यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या. त्यानुसार शहर व ग्रामीण पोलीसांनी त्याबाबतची तयारी केल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील व पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ७२ तासात राबविण्यात येणारी कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचा अंमल याबाबत आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण शिवरामसिंग वर्मा (करमाळा, माढा), अरुण प्रकाश (बार्शी, मोहोळ), श्रीधर चौहान (शहर उत्तर, व मध्य), टी नामग्याल भुतिया (अक्कलकोट व दक्षिण सोलापूर), वीरेंद्रसिंग बंकावत ( पंढरपूर, सांगोला, माळशिरस), शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामे परस्परात योग्य समन्वय ठेवून सांघिकपणे पार पाडावीत व निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निरीक्षक राज यांनी केले.
पोलीस विभागाने त्यांच्याकडील इंटेलिजन्सचा योग्य वापर करून गैरवर्तन करणाºयांवर प्रतिबंध ठेवावा असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. पोलीस विभागाने शस्त्रे, दारूचा साठा, पैशाचे वितरण या गोष्टींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवावे तसेच याबाबत आलेल्या तक्रारींवर अधिक गतीने कारवाई करून जिल्ह्यात शांतता ठेवून निवडणुका पार पाडाव्यात असे त्यांनी सूचित केले. सोलापुरातील सर्व मतदान केंद्रांवर योग्य खबरदारी घेतली असून या ठिकाणी चोख बंदोबस्त दिलेला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तसेच राज्य व जिल्हा सीमावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
पैसे वाटपाच्या तक्रारी- शनिवार व रविवारी रात्री पोलीस यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज असल्याचे निरीक्षक राज यांनी सांगितले. या दोन दिवसात पैसे वाटपाच्या तक्रारी येतील. येणाºया प्रत्येक तक्रारी तपासा. काहीवेळा खोट्या तक्रारीचे प्रकार आढळून येतील. पण पोलीस यंत्रणेने सतर्क राहिले पाहिजे. ज्या ठिकाणी चुरस आहे, तेथे याबाबत जास्त लक्ष देण्याची गरज आहे.