शिवानंद फुलारी
अक्कलकोट : हातावर पोट असलेल्या बसवणाप्पा वाले (वय-७१) आणि शिवम्मा वाले (वय-६५) या दाम्पत्याला कामाच्या ठिकाणी कोरोनाने घेरले. त्यानंतर दोघांवर उपचार सुरू केले. अखेर सहा दिवसांच्या फरकाने दोघांचीही प्राणज्योत मालवली. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून गेलेल्या दाम्पत्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हन्नूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
वाले कुटुंब मूळचे हन्नूरचे. तुटपुंजी तीन एकर नापीक जमीन. दहा वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथील रहिवासी झाले होते. तेथेच शासकीय धान्य गोडाऊनमध्ये पती-पत्नी कामाला होते. महिनाभरापासून शिवम्मा आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यातून काहीच फरक पडला नाही. अखेर १२ मे रोजी त्यांचे निधन
झाले. जोडीदार गेल्याचा धसका घेऊन बसवणप्पा आजारी पडले. तपासणीत तेही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना अक्कलकोटच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, आजार बळावत चालल्याने प्रकृती बिघडत होती. रोजच्या रोज ऑक्सिजन लेव्हल कमी होत गेली. त्यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी गावाचा गरीब माणूस म्हणून आर्थिक भार उचलून मुलाशी चर्चा करून सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचे तयारी दर्शविली होती.
बसवणप्पा यांनी मात्र सोलापुरात जाण्यास परखड विरोध केला. यामुळे नाइलाजास्तव अक्कलकोट येथे उपचार सुरू ठेवले. उपचारदरम्यान पत्नीच्या निधनाची हाय खाऊन सहा दिवसांत १९ मे रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. हन्नूर येथेच अंत्यसंस्कार झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
----
आयुष्यभर रोजीरोटीसाठी बसवणप्पा-शिवम्मा यांनी संघर्ष केला. दहा वर्षांपूर्वी गाव सोडावे लागले. सोबत शिवानंद व गिरमला ही दोन मुले व त्यांचे कुटुंब राहत होते. आणखी एक मुलगा हन्नूर येथेच राहत होता. हातावर पोट घेऊन असणाऱ्या वाले कुटुंबात आठवड्यात दोन बळी गेल्याने कोरोनाने सर्वांचीच झोप उडविली आहे.
---
२६बसवणप्पा वाले/ २६ शिवम्मा वाले