सोलापूरात दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्नसोलापूर : सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात असताना सोलापुरातील जैन गुरुकूल प्रशालेच्या परीक्षा केंद्रावरील दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका मुलीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या दरम्यान घडली. सुप्रिया संगपाल गाडे असे जखमी मुलीचे नाव आहे.शहरात सर्वत्र दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. मंगळवारी इतिहास विषयाचा पेपर होता. जैन गुरुकूल केंद्रांवर सकाळी १०.३० च्या सुमारास सर्व परीक्षार्र्थींना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. पेपर सुरु होऊन साधारण अर्धापाऊण तासाचा कालावधी लोटला असतानाच अचानक एकच गोंधळ उडाला. शाळेतील तिसऱ्या मजल्यावरुन सुप्रिया संगपाल गाडे या विद्यार्थिने उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने जैन गुरुकूल शाळेतील शिक्षकांनी तातडीने जवळच असलेल्या चिडगुपकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही वार्ता कळताच तिची आजी, आई सुजाता, बहीण सुप्रिया सह नातलग हॉस्पिटलमध्ये धावले. अर्धा तास तेथे तिच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर सव्वा बाराच्या सुमारास तिला रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्धावस्थेत तिला जैन गुरुकूलचे शिक्षक, जखमीची बहीब सुप्रिया यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर बी ब्लॉकमधील ट्रामा आयसीयू वॉर्डात उपचार सुरु आहेत. ----------------------------जखमी आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनीजखमी सुप्रिया ही मंगळवार पेठेतील आदर्श हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिचा दहावीच्या परीक्षेसाठी जैन गुरुकूल प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर बैठक क्रमांक आला होता. तळे हिप्परगा मश्रूम गणपती परिसरात ती वास्तव्यास असून, ती तेथून दररोज शाळेला येत असे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ---------------------------शिक्षणाधिकाऱ्यांची रुग्णालयात धावसेवा सदन प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर या घटनेचे वृत्त कळताच जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी तातडीने चिडगुपकर हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन जखमीबद्दल माहिती घेतली. त्यांच्यासमवेत जैन गुरुकूल प्रशालेचे प्राचार्य आशुतोष शहा होते. तेथे रुग्णालय प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली. जखमी सुप्रियाची गंभीर अवस्था असल्याने तिला अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिल्याने तिला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
सोलापूरात दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: March 22, 2017 5:33 PM