आप्पासाहेब पाटील, सोलापूर: नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शाळा सुरू होऊन दोन दिवस उलटले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याची खंत अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. एक राज्य..एक गणवेश या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावे या मागणीसाठी बार्शीतील युवा सेनेने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. यावेळी युवा सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शासन परिपत्रकाची होळी करून शासनाचा निषेध केला.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी एक राज्य, एक गणवेश जाहीर केल्याप्रमाणे शिक्षण विभाग यांनी एक शासन निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शाळा सुरू होऊन आठवडा होऊन गेला पण गणवेश वाटप करण्यात आला नाही, त्यामुळे पालक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सोबतच काही शाळेत पाठ्यपुस्तक वाटप काही विद्यार्थींना झाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून बार्शी पंचायत समितीसमोर शासन निर्णयाची युवा सेना बार्शी यांच्या वतीने होळी करण्यात आली. या महिना अखेर पर्यंत गणवेश वाटप न झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलने करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी युवासेना राज्य सहसचिव उषा पवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत रामगुडे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख पांडुरंग घोलप, हर्षवर्धन पाटील, युवा सेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, युवा सेना उपशहरप्रमुख दिपक तिवाडी, युवासेना शहर सचिव दिपक कसबे, बाळराजे पिंपळे, अर्जुन सोनवणे, सागर हांडे, बाळासाहेब पवार यांच्या सह युवासौनिक उपस्थित होते.