सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आराेप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर मंत्री आदित्य मुस्के यांनी केला आहे. हा विषय माळशिरसचे आमदार तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य राम सातपुते यांनी थेट विधानसभेत मांडला. त्यामुळे राज्यभर यावर चर्चा सुरू झाली आहे. अभाविपचे आरोप विद्यापीठाने फेटाळले असून कॅन्टीन नूतनीकरण खर्चाचा तपशील सिनेट सदस्यांच्या सभेत सादर केला आहे. यात सिनेट सदस्यांनी मंजुरीदेखील दिली असून भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे आहेत, असे कुलसचिव योगिनी घारे यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना आदित्य मुस्के यांनी सांगितले, विद्यापीठाच्या आवारात कॅन्टीन आहे. या कॅन्टीनच्या नूतनीकरणासाठी विद्यापीठाने २०२१ व २२ मध्ये २३ लाख ५२ हजार ५२३ रुपये खर्च केले. प्रत्यक्षात नूतनीकरणाच्या नावाखाली विद्यापीठाने केवळ पत्रे बदलली आहेत. त्यासोबत रंगरंगोटीची कामे केली. हा किरकोळ खर्च आहे. याकरिता २३ लाख खर्च म्हणजे यात निव्वळ भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. या विद्यापीठाकडे तक्रार करायला गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट नाकारली आहे. यासोबत विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेकरिता २०२२ व २३ करिता विद्यापीठाने १५ लाखांची तरतूद केली होती. यापैकी केवल ५ लाख खर्च केले. म्हणजे दहा लाख रुपये पडून आहेत. याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला नाही. यंदा केवल साडेबारा लाखांची तरतूद केली आहे. हे चुकीचे आहे. परंतू, हे सर्व आरोप विद्यापीठाचे कुलसचिव योगिनी घारे यांनी फेटाळले आहेत.