राजकुमार सारोळे
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील १५९ वर्षांचा इतिहास असलेली झेडपीची मराठी शाळा आता कात टाकणार आहे. सीएसआर फंडातून ही शाळाडिजिटल करण्याचा झेडपीने निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळेची स्थापना १८ जानेवारी १८६१ मध्ये झाली आहे. इंग्रजाच्या काळात मंद्रुप इलाख्याचे वतनदार नारायण देशपांडे हे होते. त्यांच्या अखत्यारित २० गावे होती. या गावांसाठी ही केंद्रशाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात पहिली ते सातवीपर्यंत वर्ग या शाळेत भरत होते. बिगर आणि इनफ्रंटचा अभ्यासक्रम या शाळेसाठी होता. १९२५ मध्ये गावात उर्दू शाळा सुरू करण्यात आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला. १९५४ मध्ये उर्दू शाळेशेजारीच मराठी मुलींची शाळा सुरू करण्यात आली. केंद्रशाळेसाठी दगडी इमारतीत सहा खोल्या बांधण्यात आल्या होत्या. इमारतीवर सिमेंटच्या पत्र्याचे छत होते. सन २०१२ मध्ये हे छत बदलण्यात आले. त्यानंतर या शाळेशेजारी सिमेंटचा स्लॅब असलेली दगडी इमारत बांधण्यात आली. सन २००० नंतर ही इमारत पाडून पुन्हा बांधण्यात आली व वर्गखोल्या वाढवून मुलींची शाळा, उर्दू शाळेचे या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
मंद्रुपच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत सध्या २६0 मुले, मुलींच्या शाळेत २५६ आणि उर्दू शाळेत १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी मुला-मुलींची शाळा चौथीपर्यंत तर उर्दू शाळा सातवीपर्यंत आहे. दोन मुख्याध्यापक व २३ शिक्षक या शाळांवर कार्यरत आहेत. शाळेत पूर्वीपासूनचे रेकॉर्ड आहे. या शाळेत शिक्षण घेऊन परिसरातील अनेक व्यक्ती मोठ्या हुद्यावर गेल्या.
आत्तापर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्वांचे रेकॉर्ड शाळेत उपलब्ध आहे. यातील दोन रेकॉर्ड रजिस्टर मोडी लिपीत आहेत. त्यानंतर ११0 वर्षांचे रजिस्टर मराठीत आहे. कोणीही येऊन शाळेचा दाखला मागितल्यास आडनावाच्या पहिल्या अद्याक्षरावरून दहा मिनिटात नावाचा शोध घेऊन दाखला देण्याची सोय करण्यात आली आहे. अशाप्रकारे परंपरागत पद्धतीने शिक्षण देणाºया या शाळेचा इतिहास बदलण्याचा निर्णय झेडपी शिक्षण विभागाने घेतला आहे.
जिल्हाधिकाºयांची मदतआहेरवाडी येथील एनटीपीसी कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १ कोटी ७५ लाखांचा सीएसआर जमा केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना हा निधी शिक्षणासाठी वापरण्याची सूचना केली आहे. चांगल्या शाळा डिजिटल करण्याचे प्रस्ताव देण्याबाबत सूचित केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी शाळांची माहिती मागविली. त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, होटगी आणि कंदलगाव शाळांची निवड केली. या शाळांची पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना केल्या. तिन्ही शाळांचे ५२ वर्ग डिजिटल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी वायचळ यांनी मंद्रुप शाळेला भेट देऊन पाहणी केली.
शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा- मंद्रुप झेडपी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव हे आहेत. २00९ मध्ये त्यांनी पदभार घेतला. शाळेच्या परिसरात झाडे लावून परिसर हिरवागार केला. मैदानात जॉगिंग पार्क, शाळेला कुंपण, लोकसहभागातून कमान,खिचडी शिजविण्यासाठी किचन उभे केले. शासनाने या शाळेला पाच लाखांची अग्निपंख प्रयोगशाळा मंजूर केली आहे. ग्रामपंचायतीने विजेसाठी सोलर पॅनेल बसवून दिले आहेत. रात्री बरीच मुले अभ्यासासाठी असतात. अभ्यासासाठी हायमास्ट दिव्याची मागणी करण्यात आली आहे. आता झेडपी प्रशासनाने शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व वर्गात स्मार्टस्कूलची यंत्रणा बसविली जाईल. या यंत्रणेसाठी वीजपुरवठा करण्यासाठी सोलार पॅनल बसविले जाणार आहेत.
जिल्हाधिकाºयांनी आलेला सीएसआर फंड शिक्षणासाठी दिला आहे. त्यातून मंद्रुप, होटगी व कंदलगाव शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. मंद्रुप शाळेची मी स्वत: पाहणी केली आहे. शाळेचा इतिहास मोठा आहे. येथील मराठी व उर्दूचे २३ वर्ग स्मार्ट करण्यात येणार आहेत. - प्रकाश वायचळमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद