सोलापूर : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वात जास्त महत्व प्राप्त होताना दिसत आहे. बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, जे समाजाला उपयोगी पडेल त्यावर जास्त भर द्यावा, असे आवाहन पद्मविभूषण प्रा. एम.एम. शर्मा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा दीक्षांत समारंभात प्रा. एम.एम.शर्मा बाेलत होते. यावेळी मंचावर खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले होते.
पद्मविभूषण प्रा. शर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. विद्यापीठ लहान असूनही आज ४६ संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केले, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नये. शिक्षकांनी चांगले शिक्षण देणे आणि संशोधनावर भर देणे महत्त्वाचे आहे. मोबाईल, कोव्हिड वॅक्सिन सारख्या मानव उपयोगी संशोधनावर भर द्यावा. शिक्षक म्हणून ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावे. प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे, ती जपावी. आपल्या मातृभाषा मराठीवर सर्वांनी प्रेम करावे. महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.