आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : सोलापूर विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या भटके विमुक्त जाती (एन.टी), इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी) , विशेष मागास प्रवर्ग (एस. बी. सी) आणि अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. आजवर ९१ लाखांची शिष्यवृत्ती थकीत असून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. सोलापूर विद्यापीठात एकूण १८ अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एन.टी., ओ.बी.सी. आणि एस.सी. प्रवर्गातील ५५0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २0१४-१५ या कालावधीत समाजकल्याण विभागाचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आल्याने बहुतांश विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. २0१५-१६ मध्ये समाजकल्याण विभागाच्या वतीने महाडेबीटद्वारे ई-स्कॉलरशिप सुरू करण्यात आली होती. यामध्ये आॅनलाईन अर्ज मागवण्यात आले होते; मात्र वर्षभर ही सिस्टीम बंद-चालू होत असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. काही दिवसानंतर तर सर्व सिस्टीम बंद पडल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही. २0१६-१७ मध्ये देखील हाच अनुभव आल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली नाही. विद्यापीठ स्थापन झाल्यापासून आजतागायत पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना तीन वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे.-------------शिष्यवृत्ती दिली जाईल!- तांत्रिक कारणास्तव २0१५-१६ मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली नाही. २0१६-१७ या वर्षातील विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील काही बिले काढण्यात आली असून ती विद्यार्थ्यांना तत्काळ देण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित गवले यांनी दिली. ---------------विद्यापीठाच्या वतीने सर्व अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वारंवार पाठपुरावाही करण्यात आला आहे. विद्यापीठातील एकूण ५५0 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप प्रलंबित असून याची एकूण रक्कम ९१ लाखांपर्यंत जाते.- अशोक मल्लाव, वरिष्ठ लिपिक, सोलापूर विद्यापीठ. ----------------------गेल्या तीन वर्षांपासून बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे अन्यथा समाजकल्याण विभागाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल. प्रवीण कांबळे, जिल्हाध्यक्ष, बहुजन स्टुडंट फोरम
सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना़, विद्यापीठाचा कारभार संथगतीने, म्हणे... पाठपुरावा सुरू आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:46 AM
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. आजवर ९१ लाखांची शिष्यवृत्ती थकीत असून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.
ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठात एकूण १८ अभ्यासक्रम शिकवले जात आहेत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली नाही