सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी संकल्पना समजून घेतल्यास ती लवकर समजते. दृक्श्राव्य माध्यम, प्रेझेंटेशन आदी साधने वापरल्यास विद्यार्थी अधिक कुतूहलाने त्याकडे पाहतात. याचाच विचार करून बी. एफ. दमाणी प्रशालेत विविध प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतात. पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर विषयावर स्वत: पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन सादर करतात. यामुळे क्लिष्ट विषयही सोप्या पद्धतीने इतरांना समजावून सांगता येतो.
अभ्यासक्रम तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विषयांची निवड हे विद्यार्थी करतात. त्याला अनुसरुन पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन तयार करण्यात येते. विद्यार्थ्यांना अडचण असल्यास शिक्षक मार्गदर्शनही करतात. यानंतर विद्यार्थी निवडलेल्या विषयांचे सादरीकरण इतर विद्यार्थ्यांपुढे करतो. त्या विषयावर शंका असल्यास इतर विद्यार्थी त्याचे निरसन करून घेतात.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरणाची कौशल्ये येतात. व्यासपीठावर जाऊन बोलणे याचा अनुभव त्यांना येतो. या उपक्रमासाठी दरवर्षी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. उत्कृष्ट सादरीकरण करणाºया विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीसही देण्यात येतात. शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. नियमित लिखित अभ्यास प्रत्येक विषयाचा सोडवून घेतला जातो, अभ्यासात अधिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थी दत्तक योजना अवलंबली जाते. सराव परीक्षांचे आयोजन केले जाते. मासिक चाचण्या घेतल्या जातात. यामुळे विद्यार्थी सर्व बाजूने तयार होतो. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक सराव चाचण्या, विषयानुरूप प्रकल्प, नियमित लिखित अभ्यास प्रत्येक विषयाचा सोडवून घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या शंकांचे वेळीच निराकरण केले जाते.
स्पर्धा परीक्षांची तयारी !गुणवत्ता विकासासाठी शाळेकडून विविध परीक्षांची तयारी करून घेण्यात येते. यात प्रामुख्याने प्रज्ञा, प्रावीण्य, स्कॉलरशिप, एमटीएस, मंथन, एनटीएस, आॅलिम्पियाड, आयटीएस, परीक्षांचा समावेश असतो. या परीक्षांमुळे भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जातानाचे बळ विद्यार्थ्यांना आपोआपच प्राप्त होते. याशिवाय आंतरशालेय वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, पुस्तक परीक्षण, कथाकथन, गायन, वादन, या नानाविध स्पर्धा घेण्यात येतात. यामुळे विविध विषयातील अनुभव संपन्नता वाढीस लागते.
प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिकाद्वारे शिकता यावे, यासाठी शाळेतर्फे क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. यातूनच विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, व्यापार, व्यवस्थापन व्यवहार कौशल्य या गुणांचा परिचय करून दिला जातो. ऐतिहासिक, वैज्ञानिक, धार्मिक, पर्यावरणीय स्थळांना सहलीद्वारे भेटी दिल्या जातात. सहलीमधून पर्यावरणवादी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशांचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळते.- जे. एस. मळेकरमुख्याध्यापिका, बी. एफ. दमाणी प्रशाला