राज्यात कोराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून १४ जून २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते ३.३० या कालावधीमध्ये दररोज ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
प्रथम टप्प्यात इयत्ता १० वी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकाचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकाचे प्रक्षेपणही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.man.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे.
तरी या शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना दिल्या आहेत.