सोलापूर : राज्याच्या सामाजिक न्याय योजनेंतर्गत दहावीनंतर दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे पैसे बँकेऐवजी आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) मार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात येणार आहेत़ या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास सुलभ व सोयीस्कर होणार आहे़ तसेच विद्यार्थ्यांची आधार कार्ड लिंक अथवा बँक खात्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांना पोस्टात खाते उघडल्यानंतर त्वरित शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे विद्यार्थी देखील समाधानी होत आहेत.
दरम्यान, बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्वप्रकारच्या बँकिंग सेवा पोहोचविणे हा उद्देश घेऊन भारतीय टपाल विभागांतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक १ सप्टेंबर २०१८ ला सुरू झाली असून सोलापूर जिल्ह्यात अद्याप १ लाख २० हजार नागरिकांनी पोस्ट बँकेत आपले खाते उघडले आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदाराला बोटाच्या ठशाद्वारे पोस्टात तर पोस्टमन हे घरपोच पैसे देणे अशा सुविधा दिल्या आहेत.
अशी होणार शिष्यवृत्ती जमा...आयपीपीबीतर्फे शिष्यवृत्तीची ही नवीन प्रणाली ८ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे तत्काळ मिळावेत, यासाठी सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांंची यादी टपाल विभागाला पाठवली आहे. सोलापूर जिल्ह्यात २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे विद्यार्थ्यांचे खाते उघडले जाणार आहे. विद्यार्थ्याचे नाव टाकल्यावर विद्यार्थ्यांचे पैसे शासन या प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहेत. अद्याप ८०० विद्यार्थ्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाते उघडले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे खाते उघडण्याबाबत माहिती दिली असून उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकरच खाते उघडावे असे आवाहन पोस्टाद्वारे करण्यात आले आहे.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाºया शिष्यवृत्ती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमुळे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट आॅफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडावे. - एस. पी. पाठक- प्रवर अधीक्षक, पोस्ट कार्यालय, सोलापूर