पिंटू विभूते नान्नज : आईच्या खुनानंतर वडील कारागृहात... मग अनाथ झालेल्या मुलांनी करायचे काय? अंगातील कलेनेच या मुलांना तारले. सध्या येरवडा कारागृहात असलेल्या नवनाथ लोहार यांची अभिजित आणि गजानन ही मुले आजी-आजोबांसमवेत गणेशमूर्ती आणि लक्ष्मी मुखवटे बनविण्यात दंग आहेत.
गोरख लोहार हे ४५ वर्षांपासून लक्ष्मी मुखवटे आणि गणेशमूर्ती तयार करतात. त्यांचा मुलगा नवनाथ हाही या कलेत पारंगत होता. मात्र पत्नीच्या खुनानंतर तो येरवडा कारागृहात गेला. अभिजित हा सातवीत असून, तो सोलापुरातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतोय. गजानन हा गावातच चौथीत शिकत आहे. सध्या आजोबा गोरख आणि आजी विमल यांच्या हाताखाली दोन्ही मुले मूर्ती कलेत पारंगत झाली असून, या व्यवसायाला गती देण्याचे काम दोन मुले करीत आहेत. काही दिवसांपासून आलेल्या गणेशोत्सवाची तयारी ठिकठिकाणी सुरू आहे़ यासाठी मूर्तीकारांसोबत सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे पहावयास मिळत आहे़
आकर्षक व रेखीव मूर्तींना चांगलीच मागणी- पूर्वी लोहार कुटुंबीय मातीच्या मूर्ती बनवत असत. जसा काळ बदलला तसा प्लॅस्टर मूर्तीचा जमाना आला. ही कलाही या कुटुंबातील सदस्यांनी आत्मसात केली आहे. आकर्षक आणि रेखीव मूर्ती मिळत असल्याने गणेशभक्तांची या मूर्तींना चांगलीच मागणी आहे.
माझ्या मुलाचे अन् सुनेचे दु:ख विसरुन मी मूर्तीकलेत रमलो आहे, ते केवळ नातवांसाठी. गावातील औदुंबर शिंगाडे यांचे आर्थिक सहकार्य मिळत असल्याने ही कला टिकून आहे. मला शेती नाही. बँका कर्ज देत नाहीत. बँकांनी मदत केली तर हा व्यवसाय वाढणार आहे.-गोरख लोहारमूर्तीकार, नान्नज