आषाढी यात्रा आली की, पंढरपुरातील अनेक पक्ष, संघटना मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येऊ देणार नाही, असा पवित्रा घेऊन राज्यात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मागील अनेक वर्षांपासून अशा संघटनांच्या स्टंटबाजांना रोखण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून होते. तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन, मुख्यमंत्र्यांसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे काम नेते व संघटना, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असते.
सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहरासह लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. यात्रा कालावधीत विविध संघटनांच्या मागण्यांबाबत बेकायदेशीर जमाव होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय निवेदन स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस.पी. तिटकारे व साहाय्यक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एस.बी. साठे यांची नेमणूक केली आहे.
---
विविध संघटनांच्या काही मागण्यांबाबत निवेदन असेल तर त्यांनी ती निवेदने स्वीकृती कक्षामध्ये द्यावीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी