अध्यक्षस्थानी सभापती रणवीर राऊत होते. यावेळी सत्ताधारी आमदार राजेंद्र राऊत गटाचे ११, माजी आमदार दिलीप सोपल गटाचे ५, राजेंद्र मिरगणे गटाचे २ संचालक उपस्थित होते.
बाजार समितीच्या आवारातील वजन काट्याची क्षमता वाढविणे, रस्ते डांबरीकरण व विकासकामांना मंजुरी देणे, बार्शी व लातूर येथे शीतगृह बांधणे आदी ३१ विषय अजेंड्यावर होते.
विरोधी संचालकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यांच्या शंकांचे निरसन सभापती रणवीर राऊत, रावसाहेब मनगिरे यांनी केले. केंद्र शासनाच्या इनाम योजनेचे काम असमाधानकारक असल्याचा अभिप्राय आला असला तरी इतर बाजार समित्यांपेक्षा आपले काम चांगले आहे. यापुढे आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना सभापती राऊत यांनी प्रशासनाला दिल्या.
वैराग व बार्शी बाजार समिती आवारातील विविध विकासकामांच्या विषयांनाही या सभेत मंजुरी देण्यात आली. रावसाहेब मनगिरे यांनी आपण सत्ताधारी विरोधक असा मतभेद न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करीत असल्याचे सांगितले. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वोत्तम काम करून दाखवू, अशी ग्वाही दिली.
आपणास एखादा विषय योग्य वाटला नाही तर त्यास जरूर विरोध करावा. मात्र, केवळ विरोधासाठी विरोध करू नये, असे आवाहन केले. सभेच्या चर्चेत उपसभापती झुंबर जाधव, शिवाजीराव गायकवाड, तर विरोधी गटाच्या अनिल जाधव, साहेबराव देशमुख, कुणाल घोलप, अरुण येळे आदींसह सर्वच संचालकांनी सहभाग नोंदविला. यावेळी सचिव तुकाराम जगदाळे उपस्थित होते.
लातूर रोडवरील विकासकामांना विरोधी संचालकांचा विरोध
लातूर बाजार समितीच्या जागेत व्यापारी गाळे व शेतकरी निवास या कामाला विरोधी संचालक साहेबराव देशमुख यांनी विरोध करीत हा विषय न्यायप्रविष्ट आहे, तो प्रलंबित ठेवावा अशी मागणी केली. सत्ताधारी गटाचे संचालक रावसाहेब नवगिरे यांनी असा कोणताही स्टे नसून, असेल तर तो आपण दाखवावा, असे आव्हान दिले. त्यामुळे हा विषय चर्चेअंती बहुमताने मंजूर केला. लातूर रोडवर बांधण्यात येणारे जनावरांचे शेड व शेतकरी निवास या विषयाला विरोधी संचालकांनी विरोध नोंदविला. उर्वरित सर्व विषय सर्वानुमते मंजूर केले.
फोटो
१०बार्शी - बाजार समिती