सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार सिध्दराम म्हेत्रे, माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पुणे साखर आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक दत्तात्रय गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, बी.बी. ठोंबरे, कल्याण काळे, शहाजी पवार यांच्यासह सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री देशमुख म्हणाले, सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी प्रादेशिक सहसंचालक कार्यालय सुरु केले आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेचे विभागीय कार्यालय सोलापूरात सुरु करण्यासाठी प्रयत्न आहेत.
सहकार मंत्री देशमुख म्हणाले, ऊसाचे उत्पादन वाढावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण, आभ्यास दौरे साखर कारखान्यांनी आयोजित करावेत. प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यात साखरेचा उतारा आहे तसा उतारा सोलापूर जिल्ह्यातही मिळावा यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. साखर कारखानदारीसमोर असणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर मिळण्यास मदत व्हावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सहकार मंत्री यांनी सांगितले. साखर कारखान्यानी प्रयोगशिलतेवर भर देणे गरजेचे असून इथेनॉलसह अन्य उपपदार्थ निर्मितीकडे वळावे.
यापुर्वी साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्या अखत्यारित सोलापूर जिल्हा येत होता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सोलापूर येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी आमदार सिध्दराम म्हेत्रे, अविनाश महागावकर, ठोंबरे यांची भाषणे झाली.