भ.के.गव्हाणे
बार्शी : बार्शी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या सबजेलमध्ये आरोपी ठेवण्यासाठी क्षमता २० ची असताना आता त्यामध्ये तब्बल ६५ कैदी दाखल झाले आहेत. यामुळे येथील कैद्यांची क्षमता धोक्यात आली आहे.
अद्यापही कोरोना संसर्गाचे दृष्टचक्र सुरू असताना बार्शी तहसीलच्या आवारातील सबजेल तुडुंब भरले आहे. येथे कैद्यांचा तिप्पट भरणा झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊन कैद्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. बार्शी येथे जिल्हा सत्र न्यायालयाबरोबरच तीन प्रथमवर्ग न्यायालये शिवाय माढा, बार्शी, कुर्डूवाडी, बार्शी शहर व तालुक्यातील पांगरी, वैराग या पोलीस ठाण्यातील आरोपींना अटक करून बार्शी न्यायालयात हजर करून न्यायालयाच्या आदेशानुसार यातील कैद्यांना येथील बार्शीच्या सबजेलमध्ये ठेवले जाते.
परंतु सध्या याठिकाणी फक्त २० कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या या सबजेलमध्ये विविध गुन्ह्यातील तब्बल ६५ कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यांना अपुऱ्या जागेत जीव मुठीत धरूनच दिवस काढण्याची वेळ आली आहे. तर रात्री झोपण्याच्या वेळी जागा अपुरी असल्याने काही कैदी जागतात, तर काही झोपतात, अशी परिस्थिती आहे.
बार्शी सबजेलमध्ये खून प्रकरणातील १५, खुनीहल्ला प्रकरणातील १८, अत्याचार प्रकरणातील ११, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असलेले ४ व अन्य असे कच्चे म्हणजेच ज्यांना अद्याप शिक्षा लागलेली नाही, असे कैदी ठेवण्यात आले आहेत.
----
सुरक्षित अंतराचा फज्जा
जेलमधील सर्व कैदी पुरुष आहेत. कैद्यांची संख्या तीनपट असल्याने त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर त्याचा ताण पडत आहे.जागा अपुरी शिवाय आतमध्ये कोंदट वातावरण, पाणी अपुरे, स्वच्छतागृहाची गैरसोय, त्यामुळे सध्या त्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे सुरक्षित अंतर ठेवून कसे झोपवायचे असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
----
कोरोनाची भीती
वाढत्या कैद्यांच्या संख्येमुळे यापूर्वी याच सबजेलमध्ये अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली. त्याचा बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याची लागण झाली होती. त्यासाठी त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, असा सूर दबक्या आवाजात पोलीस यंत्रणेतून होऊ लागला आहे. येथील कोंदट वातावरण, दुर्गंधी, पाण्याची कमतरता यामुळे कैद्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन किमान १०० कैदी ठेवता येईल असे सबजेल करावे, अशी मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांच्यासह सामाजिक संघटनांमधूनही होऊ लागली आहे.
----
नवीन बराकचा प्रस्ताव बासनात
नवीन बराकच्या मागणीसाठी २०१८ पासून जिल्हा कारागृहाकडे व जिल्हा न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी बांधकाम विभागाकडेही नवीन वाढीव बराकसाठी तहसीलने प्रस्ताव पाठवूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. बार्शीच्या या सबजेलमधील आरोपींची संख्या वाढल्याने यापूर्वी सोलापूर व लातूर जिल्हा कारागृहात आरोपी पाठविले होते; परंतु तेथेही स्वीकारले नसल्याने नवीन बराकची गरज निर्माण झाली आहे.
----
बार्शी येथील सबजेलमध्ये सध्याची जागा अपुरी पडत असल्याने याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. यासाठी नवीन तीन बराकची सोय व्हावी यासाठी प्रस्तावही पाठविलेला आहे
- किरण भालेराव, सबजेलर, बार्शी