सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी घेतली. मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला. दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेऊन मदतीबाबत काय करता येईल, याबाबत विचारणाही केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक तरुण हरणा नदीत वाहून गेला. दरम्यान, त्या तरुणाचा मृतदेह ३६ तासांनंतर सापडला. यापूर्वीही हरणा नदीत पाच ते सहा जण वाहून जाऊन मृत्युमुखी पडले होते. वारंवार दुर्घटना घडत असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीच नदीवर पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. आतापर्यंत पाच ते सहा जणांना या नदीत जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नदाफ या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी शासकीय रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्वरित पूल बांधण्याची मागणी केली होती. या घटनेचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाले. ही सोलापुरातील मनिष काळजे यांनी मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सॲपवर पाठवली. ही बातमी वाचून मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला. घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित ग्रामस्थांना जाऊन समक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मदत कशी करता येईल याबाबत चर्चा झाली. यावेळी कॉन्फरन्स कॉलवर मनिष काळजे हेही होते.
----------
ग्रामस्थांनी आंदोलन घेतले मागे...
पुलाच्या कामासाठी मुस्ती ग्रामस्थांनी गुरूवार २१ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना दिल्या. याबाबत मनिष काळजे यांनी ग्रामस्थांना संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी दिली.
----------
मुख्यमंत्री कार्यालयाने हरणा नदीच्या दुर्घटनेविषयी माहिती घेतली. त्यांना मदत कशी करता येईल याबाबत विचारले. आम्ही त्या मृत कुटुंबियांना मदत केली आहे. पुलासंदर्भातही लवकरच कार्यवाही पूर्ण करू.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर