राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एक हजार १३४ गावे व वाड्या-वस्त्यांपैकी २१२ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले होते; पण दुसऱ्या लाटेत यातील १३९ गावात कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे, तर ७३ गावांनी या महामारीला वेशीवरच रोखले आहे.
देशात मार्च २०२०मध्ये कोरोना महामारीला सुरुवात झाली; पण २३ एप्रिलपर्यंत सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होता. १२ एप्रिल रोजी शहरात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर शहराच्या संपर्कातून १२ दिवसांनी म्हणजे २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागात पहिला रुग्ण आढळला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार गावी म्हणजे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पोहोचल्यावर कोरोनाग्रस्त आढळला होता. त्यामुळे ११ एप्रिल रोजी ग्रामीणमधील वांगी हे पहिले प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. पण तपासणीत या भागात रुग्ण आढळला नाही. त्यानंतर पाटकुल येथील महिलेला कोरोनाची लागण झाली. तेथून ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले.
४ ऑक्टोबरपर्यंत २१२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. त्यानंतर संसर्ग कमी होत गेला. फेब्रुवारी २०२१नंतर ग्रामीण भागात पुन्हा कोरोना संसर्ग वाढला.