शेतकरी संघटनेच्या वतीने जनप्रबोधन यात्रेनिमित्त ते करमाळ्यात आले होते. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
रघुनाथ पाटील म्हणाले, २००४ पूर्वी राज्यातील शेतकरी संघटना अतिशय मजबूत होत्या. शेतमालाचे व उसाचे दर ठरवत होत्या. पण शेतकऱ्यांना कमकुवत केल्याशिवाय राज्य करता येत नाही, हे लक्षात ठेवून राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडली. त्यामुळेच राजू शेट्टी यांना खासदार, सदाभाऊ खोत यांना मंत्री केले, असा आरोप करीत उसाच्या एफआरपीचेही सध्या तुकडे पडत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे भांडवल करून शेतकरी नेते सत्तेत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी न्याय मिळाला नाही. सध्याच्या सरकारमध्ये कारखानदारांचे प्रतिनिधी बसले आहेत. त्यामुळे उसाच्या दराबाबतही अनिश्चितता आहे. सरकार उसावर प्रतिटन चार हजार रुपये कर आकारते; परंतु उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये देताना सरकार व कारखानदारांचे हात थरथर कापतात. आज शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. तो थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसल्याशिवाय आणि शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव, उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.