सोलापूर : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही ऊस क्षेत्राचा अंदाज नसल्यामुळे राज्यातील साखर हंगामाने वेग घेतला नाही. आतापर्यंत १०१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उसाच्या टंचाईमुळे सुरू होणाºया साखर कारखान्यांची संख्या यावर्षी कमीच राहणार असली तरी ती किती राहील?, याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाला अद्याप आलेला नाही.
परतीच्या पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरु राहिल्याने शिवाय दिवाळी व विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे यावर्षी साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी उशिराने मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री गटाची बैठक होईल व साखर हंगामाला परवानगी मिळेल असे सांगितले जात होते; मात्र सरकार स्थापन होत नसल्याने २२ डिसेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. बुधवारपर्यंत राज्यात १०१ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. या कारखान्यांनी ६० लाख ८४ हजार मे.टन गाळप केले असून ५५.५१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
कोल्हापूर पट्ट्यात महापूर तर उर्वरित भागात दुष्काळाची झळ उसाला बसली आहे. त्यामुळे नक्की किती ऊस गाळपाला येणार?, याचा अंदाज साखर कारखानदारांना येत नसल्याने गाळप हंगाम सुरू करण्यास बहुतेक कारखानदार धजत नसल्याचे सांगण्यात आले. कारखाने सुरू करण्यामध्ये सहकारी कारखानदार आघाडीवर असून खासगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करीत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास वेग आलेला नाही.
कोल्हापूर, पुणे विभाग आघाडीवर
- - कोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
- - अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. अमरावती विभागातील दोन कारखाने सुरू झाले असून नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप सुरू झालेला नाही.
नोंद अवघ्या सात कारखान्यांची - सोलापूर साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील १५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन असे १८ कारखाने सुरू झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ कारखान्यांनीच गाळप अहवाल पाठविला आहे. अन्य ११ कारखान्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. सुरू झालेल्या काही कारखान्यांना आजही पुरेसा ऊस मिळेल की नाही, याचा भरवसा नाही.