पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष आ. प्रशांत परिचारक यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊ केला आहे. कारखान्याने सुरुवातीलाच चालू हंगामात गाळप येणाऱ्या उसाला २,१०० रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. कारखान्याने मागील गळीत हंगामात ७ लाख १ हजार मे. टन उसाचे गाळप करून १०.७४ टक्के साखर उतारा घेऊन ७ लाख ५२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्यानुसार एफआरपी २४३१ रुपये प्रतिटन निघाली आहे.
चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याकडे १० ते १२ लाख मे. टन उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने आजअखेर ४ लाख ४८ हजार ६९० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ५० हजार ४५० साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे, तर १०.०४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. मागील २९ वर्षांपासून पांडुरंग कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देत पुढे आलेला हा कारखाना सर्वाधिक ऊस दर देण्याचा विक्रम करीत आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. सुधाकरपंत परिचारक यांनी कारखान्याची उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
‘पांडुरंग’च्या लौकिकास साजेशी कामगिरी
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक नेहमी साखरेच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून व साखर तसेच उपपदार्थाबाबत देशांतर्गत धोरण लक्षात घेऊन पांडुरंग कारखान्याची प्रगती साधली आहे. त्यामुळे या कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट कारखान्यासह अन्य अनेक पुरस्कार पटकावले आहेत. हा कारखाना नावानुसार त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत आहे. अशी चर्चा सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रातून होत आहे.
एका दिवसात १२.३४ टक्के उच्चांकी साखर उतारा
२९ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार पाडुरंग कारखान्याने एका दिवसात ६ हजार ८८८ उसाचे गाळप करून ८ हजार ५०० साखर पोत्याचे उत्पादन केले. १२.३४ टक्के साखर उतारा निघाला आहे. सरासरी साखर उतारा १०.०४ टक्के घेऊन सोलापूर जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले आहे.