उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ गावात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोजच किमान १० व्यक्ती बाधित निघत आहेत. एकतर आरटीपीसीआरचे अहवाल आठवडाभरानंतर येत असल्याने बाधितांचे आजार बळावत आहेत. अधिक त्रास होऊ लागल्यानंतर उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. यापैकी अनेकांना बेडच मिळत नाही. बेड मिळेपर्यंत आजार वाढल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
यापैकी सिद्राम नामदेव मिसाळ यांचे एक कुटुंब. पत्नी, सून व नातू कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खेड येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सिद्राम मिसाळ यांना त्रास होत असल्याने मुलाने चार-पाच दवाखाने धुंडाळले; परंतु बेड मिळाला नाही. शेवटी शुक्रवारी सिद्राम मिसाळ घरी आले. सकाळी घरी एकटेच असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू
२५ मार्चपासून २४ एप्रिलपर्यंत बिबीदारफळ येथील २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन दिवसांत दोन महिला व तीन पुरुष अशा पाच व्यक्ती दगावल्या आहेत. यापैकी चार व्यक्ती या कोरोनाबाधित होत्या.
-----
पाच गावांत कोरोना सेंटर
उत्तर सोलापूर तालुक्यात गाव तेथे कोरोना सेंटर अंतर्गत नान्नज येथे ३० बेड, वडाळा येथे २० बेड तर बिबीदारफळ, कोंडी व मार्डी येथे प्रत्येकी १० बेड क्षमतेची कोरोना सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
----