दक्षिण सोलापूर : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील एका तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ महेश भीमाशंकर खानापुरे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव असून सोमवारी दुपारी सोलापुरात काडादी चाळीत खोलीमध्ये पंख्याला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला़ त्यांच्याजवळ मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले़ मयत महेश खानापुरे यांची हत्तरसंगमध्ये ५ एकर शेती असून सिद्धेश्वर सहकारी बँक (२ लाख), विदर्भ कोकण ग्रामीण बँक (६ लाख), विकास सोसायटी (२ लाख) आदी बँकांमधून दहा लाख रुपये कर्ज घेतले होते़ हे कर्ज वाढत चालले होते, मात्र ते फेडले जात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावाखाली वावरत होते़ महेश आणि त्यांचा मोठा भाऊ सुरेश दोघे शेतीशिवाय सोलापूर शहरात एका खासगी कंपनीत काम करतात़ यासाठी त्यांनी तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था म्हणून काडादी चाळीत कॉटबेसिसवर खोली घेतली होती़ नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी मोठा भाऊ हा आज सकाळी विजापूरला गेला़ दरम्यान, महेश हे खोलीवर आले आणि कोणी नसल्याचे पाहून दरवाजा लावून घेतला़ पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली़ बाजूच्या खोलीतील एका मुलाने आज दुपारी २ वाजता दरवाजावरील खिडकीतून आत डोकावले असता महेश हे लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आले़ त्या मुलाने त्यांच्या घरच्यांना फोनवरून माहिती दिली़ पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे़ रात्री उशिरा महेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
---------------------------
शेती विकू न कुटुंबाला सांभाळा़
पोलिसांनी महेश यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली़ शेतीचे कर्ज खूप झाले आहे़ ती विकून माझी मुले, पत्नी, आईचा सांभाळ करा, असे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे़ यावेळी गावचे सरंपंच महादेव नरोळी यांनी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, प्रांत अधिकारी श्रीमंत पाटोळे, सर्कल अधिकारी रगटे आणि तलाठ्याशी संपर्क साधून याप्रकरणाची माहिती दिली़
-------------------------------------------
महिनाभरात दुसरा बळी
याच तालुक्यात अंत्रोळी येथे रखमाजी थोरात या तरुण शेतकर्याने महिनाभरापूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती़ या प्रकरणाला महिना लोटत नाही तोवर दुसरी घटना घडली़ बँकांची थकीत कर्जवसुली थांबविण्याचे आदेश राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले असतानाही दक्षिण सोलापुरात वसुलीचा तगादा सुरूच आहे़