हातीद येथील जनार्धन सदाशिव भंडगे यांच्यासह घरातील लोकांनी रविवारी रात्री ९ च्या सुमारास जेवण करून घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास जनार्दन भंडगे जनावरांचे झाडलोट करण्यासाठी उठले असता पत्नी राजाबाई उर्फ राजाक्का ही झोपलेल्या ठिकाणी निदर्शनास आली नाही म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना उठवून तुझी आई कुठे गेली आहे, असे विचारून बाप-लेकांनी मिळून आजूबाजूला शोधाशोध केली, मात्र ती आढळली नाही. तेव्हा जनार्दन याने भाऊ दिलीप भंडगे यास घरी बोलावून घेतले. सकाळी ७ च्या सुमारास पोलीस पाटील धनाजी खंडागळे यांनी संजीत घाडगे यांच्या ओढ्याजवळील विहिरीमध्ये एक अनोळखी महिला पाण्यावर तरंगत आहे, असे सांगितले. त्यानुसार तेथे जाऊन पाहिले असता ती राजाबाई उर्फ राजाक्का असल्याचे निदर्शनास आले. तिला पोलिसांसमक्ष विहिरीतून बाहेर काढून सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले.
याबाबत, जनार्धन सदाशिव भंडगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.