सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण पाच वर्षात काहीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. महाराष्ट्रात शेतकºयांपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या आत्महत्या हा मोठा चिंतेचा विषय झाला असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी येथे बोलताना केली.
युवक काँग्रेसतर्फे आयोजित चलो वॉर्ड अभियान अंतर्गत रामलाल चौकातील नरसिंग गिरजी मिल चाळीत आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना तांबे बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे उपस्थित होते.
यावेळी चेतन नरोटे यांनी शहरात काँग्रेसने केलेल्या कामांचा आढावा घेतला. महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन दोन वर्षे झाली, पण नगरसेवकांना दमडीचा निधी मिळाला नाही. दोन मंत्री असूनही उपयोग होत नाही. दोन्ही मंत्री गटातटाच्या भांडणात मशगुल असून, त्यांना शहराच्या विकासाची चिंता नाही, असा आरोप केला.
काँग्रेसच्या युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून दिलासा- यावेळी तांबे म्हणाले की, नोकरी नसल्याने नैराश्याने ग्रासलेले तरुण आत्महत्या करीत आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना बेरोजगार भत्ता देण्याचे धोरण आहे. युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त युवकांना काँग्रेस दिलासा देऊन स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशात मोठे उद्योग, कंपन्या आल्या. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, पण पाच वर्षामध्ये मोदी सरकारने फक्त दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.