विजयपूर : कौटुंबिक वादातून मातेने दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लक्ष्मी प्रकाश बुद्धिहाळ (वय ३६, रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजयपूर) आणि तिची दोन मुले बिरप्पा (वय ३) आणि अंकुश (वय १) अशी मृतांची नावे आहेत. मात्र सुदैवाने ७ वर्षांची दानम्मा ही बालंबाल बचावली.
८ वर्षांपूर्वी लक्ष्मीचा विवाह प्रकाश बुद्धिहाळबरोबर झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली. लक्ष्मी आणि प्रकाशचा सुखी संसार सुरू असतानाच त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले. पतीच्या भांडणाला लक्ष्मी वैतागली होती. आपल्या मुलांसह तिने जीवन संपविण्याचा विचार केला. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ती तिघा मुलांना घेऊन सातर गावाजवळील रेल्वे रुळावर आली. मुलांना रुळावर झोपण्यास सांगून तीही रुळावर पडली.
मात्र दानम्मा झोपलीच नाही. लक्ष्मीने तिला झोपण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रेल्वेच्या आवाजाने दानम्माने तेथून पळ काढला. तोपर्यंत त्याची आई आणि दोन भावंडे जागीच मरण पावली. सोलापूर-विजयपूर रेल्वे निघून गेल्यानंतर दानम्मा आपल्या आई व भावंडांना पाहण्यासाठी गेली असता तिघेही मृतावस्थेत पडलेले होते. तिघांच्याही शरीराचे तुकडे झालेले पाहताना दानम्मा जागेवरच बेशुद्ध पडली.
घटनेचे वृत्त समजताच लोहमार्गचे फौजदार शिवकुमार घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह विच्छेदनासाठी इंडी शासकीय रुग्णालयात हलविले. जखमी दानम्मा त्याच रुग्णालयात उपचार घेत आहे.
‘लक्ष्मी’ गेली... ‘प्रकाश’च्या जीवनात अंधार- सातत्याने भांडणे होत असली तरी लक्ष्मीने जीवन संपविण्याचा निर्णय घेणार, यावर प्रकाशचा विश्वास नव्हता. लक्ष्मी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्र्रकाशला जबर धक्का बसला. घटनास्थळी मृतदेहांकडे पाहत त्याने एकच हंबरडा फोडला. ‘लक्ष्मी’ गेल्याने आता ‘प्रकाश’च्या जीवनात अंधार निर्माण झाला आहे.