गतवेळच्या आवर्तनामधून सांगोला वितरिका क्र. २ मधून १५० दशलक्ष घनफूट पाणी सोडले होते. त्यासाठी ३० लाख रुपये पाणीपट्टीही आकारली होती. पण, त्यावेळी पोटकॅनाॅलच्या दयनीय अवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात गळतीही होत होती. हा पोटकॅनाॅल १९ कि.मी. इतका लांबीचा आहे. हा पोटकॅनॉल हबिसेवाडी, पारे, काळेवाडी, हंगिरगे ते गावडेवाडीपर्यंत जातो. दरम्यान, हबिसेवाडी व हंगिरगे येथील भंडेवस्तीजवळ या पोटकॅनाॅलला भगदाड पडल्याने या पाण्याचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांनी घेतला होता.
१९ कि.मी. लांबीच्या पोटकॅनाॅलबरोबरच या पोटकॅनाॅललाच हेड रेग्युलेटर बसवून बंदिस्त पाइपलाइन डिकसळ व पारे या गावासाठी आहे. तर. पुढेही हंगिरगे-घेरडीफाटा क्र. १ व हंगिरगे-घेरडी क्र. ६ अशाही वितरिका आहेत. यातून घेरडी हद्दीतील देवकतेवस्तीसह इतर भागांत पाणी जाते. पण. सद्य:स्थितीला उन्हाळी हंगामातील या पाण्यासाठी घेरडीकरांची अद्यापही मागणी नाही.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा
सध्या उन्हाळी आवर्तनासाठी नराळे, हबिसेवाडी, पारे, डिकसळ, हंगिरगे व गावडेवाडी आदी गावांच्या मागण्या आल्या आहेत. त्या अनुषंगाने १९ एप्रिलपासून म्हैसाळचे पाणी या वितरिकेतून सोडण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामातील या पाण्यासाठी पाणीपट्टी आकारणी निश्चित केली आहे. एक दशलक्ष घनफूट पाण्यासाठी ३० हजार रुपये इतकी पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून म्हैसाळ प्रकल्प योजनेस सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता उत्तम जगधने यांनी केले आहे.