उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिरासमोरील नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधाऱ्याची उंची तीन मीटर आहे. या बंधाऱ्यातून पंढरपूरसह, सांगोला शहर व ८१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
मात्र प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणीपातळी खालवली जाते. यामुळे नगरपरिषदेला शहरात एक व दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागतो. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
भीमा नदीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बंधाऱ्यांची उंची १ मीटर व लांबी १५० मीटरने वाढवण्याचा विषय नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्याबाबतचा तीन कोटींचा आरखडा तयार झाला असून तो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव यांनी सांगितले.
बंधाऱ्याची सद्य:स्थिती
बंधाऱ्याची लांबी ३३० मीटर, उंची तीन मीटर, पाणी साठवण क्षमता १०६ द.ल.घ.फू., ४५ दिवस पुरते पाणी.
असा होणार बदल
बंधाऱ्याची लांबी ११० मीटरने तर उंची १ मीटरने वाढणार, पाणी साठवण क्षमता ७० द.ल.घ.फू. वाढणार. अधिक २५ दिवस पाणीपुरवठा होणार.