रेवणसिद्ध जवळेकर
पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देश, जेणेकरुन देशवासीय हादरुन गेले. एअर सर्जिकल स्ट्राईकने ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करुन पाकची बोलती बंद केली. आम्ही सीमेवर जाऊ, आम्ही धैर्याने लढू असे आजचे युवक आपापसात म्हणू लागले आहेत; मात्र प्रत्यक्षात कोणी सीमेवर जाईल का ? यासह तेथील परिस्थितीची जाणून घेतलेल्या प्रश्नांची ही बोलकी उत्तरे !
प्रश्न : सैन्य दलात जाण्याची प्रेरणा कशी मिळाली ?उत्तर : मी मूळचा अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावचा. गावातील संभाजी शिंदे, पंडित व्हनमाने हे सैन्य दलात होते. हे दोघे सुटीला गावाकडे आल्यावर त्यांचे अनुभव कथन ऐकताना प्रेरणा मिळाली. देशासाठी आपण काहीतरी करावं, या भावनेतून मी २९ डिसेंबर १९८८ साली सैन्य दलात दाखल झालो.
प्रश्न : भारतीय सैन्य दल सक्षम असताना अतिरेक्यांचा नायनाट का होत नाही ?उत्तर : अगदी योग्य प्रश्न विचारलात. सीमेवरील तिन्ही सैन्य दलातील जवानांना काही बंधने घालून दिलेली आहेत. ठिकठिकाणी काम करताना एकच वाईट अनुभव आला. एखाद्या अतिरेक्याला मारताना दहावेळा विचार करावा लागतो. त्याच्याकडे एखादे शस्त्र अथवा दारुगोळा असावा लागतो. तो अतिरेकीच आहे, हा पुरावा द्यावा लागतो. पुरावा नसताना त्याला ठार मारले तर उलट सैनिकांवर कडक कारवाई होते. त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या हातांना मोकळेपणा दिला तर काही तासांमध्येच दहशतवादाचा नायनाट होऊ शकतो.
प्रश्न : तेथील स्थानिक लोकांची मदत मिळते का ? उत्तर : मुळीच नाही. तेथील स्थानिक लोकही अतिरेक्यांच्या दहशतीखाली दबलेले आहेत. जेव्हा-जेव्हा सैन्य दल एखादी मोहीम आखते, तेव्हा-तेव्हा मोहिमेची बारीक-सारीक घटना स्थानिक लोक अतिरेक्यांपर्यंत पोहोचवित असतात. त्यामुळे ठोस कारवाई करताना अनेक अडचणी येतात.
आपले युवक नुसते बोलतातआजही महाराष्ट्रातील युवक नुसते बोलत असतात. कामाच्या निमित्ताने त्यांची इतर ठिकाणी बदली झाली तर ते बदली ठिकाणी जाणे टाळतात. सोलापुरातही हेच चित्र दिसते. नुसते बोलून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष सैन्य दलात दाखल होऊन कृती झाली पाहिजे, असे निवृत्त आॅनररी कॅप्टन रखमाजी मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तर भारतीय संस्कृती समजतेभारतीय संस्कृती विशाल आहे. सैन्य दलात काम करीत असताना अनेक प्रांतात ड्यूटी बजावावी लागते. ज्या-त्या प्रांतातील संस्कृतीचे दर्शन घडते. निवृत्तीनंतर तो सैनिक एक परिपक्व माणून बनतो. यासाठी युवकांनी सैन्य दलात जावे, अशी माझी अपेक्षा आहे.
युद्ध झाले तर मी जाणारच-मोरेसध्या भारत-पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. जर युद्ध झालेच तर मी देशासाठी सीमेवर लढण्यासाठी नक्कीच जाईन, असे रखमाजी मोरे यांनी सांगितले.