सोलापूर : पल्स पोलीओ लसीकरण मोहिम ही अत्यंत व्यापक व महत्वाकांक्षी योजना आहे. या मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यातील 3002 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
ही मोहिम जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, नागरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, व महानगरपालीका क्षेत्रासाठी आरोग्याधिकारी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. आपल्या जिल्हयातील ५ वर्षाच्या आतील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवास करणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, विटभट्टया, ऊस तोड चालू असलेली ठिकाणे येथे लसीकरण केद्रे उघडण्यात येणार आहेत. या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण तीन हजार दोन लसीकरण केंद्र , 5 लाख 50 हजार पोलीओ डोस, 7138 इतके मनुष्यबळ, 598 पर्यवेक्षक, 144 मोबाईल टिम सज्ज असणार आहेत. तसेच 153 वैद्यकीय अधिकारी, 09 आरोग्य पर्यवेक्षक, 57 आरोग्य सहाय्यक (स्त्री), 112 आरोग्य सहाय्यक (पु), 242 आरोग्य सेवक, 452 आरोग्य सेविका, 4186 आंगणवाडी कार्यकर्ता, 2763 आशा कार्यकर्ता यांचा देखील समावेश असल्याची माहिती लस समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली.
पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना रविवार नंतर 3 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस दिली जाणार आहे.