काशीनाथ वाघमारे
सोलापूर : चहाप्रेमींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरावर सूर्यनारायणाची चांगलीच वक्रदृष्टी पडली आहे. वाढत्या तापमानामुळे फ्लेव्हर शौकिनांनी नेहमीच्या चहाकडे काहीअंशी पाठ फिरवली असून, जिल्ह्यातील चहाविक्रीही निम्म्यावर आली आहे. याचा चहा व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.
शहरात हजार चहा विक्रेते...
गिरणगाव शहरात मोठमोठ्या कापड गिरण्या बंद पडताच बरेच कामगार हॉटेल-चहा कॅन्टीन व्यवसायाकडे वळले. अनेकांचा व्यवसाय चांगला चालला. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात हा व्यवसाय फारसा चालत नाही अन् बंदही होत नाही. त्यामुळे चहा विक्री करणारा दुसरा व्यवसाय करीत नाही. शहरात जवळपास हजार चहा विक्रेते असून, जिल्ह्यात ही संख्या लाखावर आहे. शहराबाहेर ढाबे, नाक्यावर पानाच्या दुकानाबरोबर चहा क
कॅन्टीन मोठ्या प्रमाणात आहेत. याबरोबरच औद्योगिक वसाहती, शाळा-महाविद्यालय, रुग्णालय, शासकीय कार्यालय परिसरातही चहा दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
३) विक्री निम्म्याने घटली
सोलापूर शहरात पूर्वीपासून साधा चहा विकला जातोय. याबरोबरच शौकिनांची संख्या वाढत गेली अन् केटी, बूस्ट, मसाला चहा, लेमन टी, ब्लॅक टी, गुलकंद, खजूर चहा, तंदुरी चहा, गुलाब केटी, चाटी गल्लीतील उकाळा, जमना चहा अशा अनेक प्रकारच्या फ्लेव्हरमध्ये चहाची उपलब्धता आहे. या शहरात औद्योगिक वसाहती, व्यापारपेठा असल्याने कामगारवर्गाची संख्या मोठी आहे. या कामगारांना एरव्ही दिवसातून चार वेळा चहा लागतो, आता तो दोन वेळेवर आला आहे. मधल्या दुपारच्या काळात हा वर्ग आता थंड मठ्ठा, ताक, दुग्धजन्य पदार्थ, पाणीदार फळांकडे वळाल्याने चहावर निम्मा परिणाम झाला आहे.
दूध खराब होत असल्याने तोटाही वाढला
कोरोनाकाळात आहार-विहाराबाबत जागरूकता वाढली आहे. कमर्शिअल गॅसचा दर आता २३०० रुपयांवर, तर दुधाच्या दरात महिनाभरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. २०१४ पासून दुधाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दूध सायंकाळपर्यंत वापरले नाही तर ते खराब होते.
५) पारा ४२ अंशांवर
मागील काही दिवसात उन्हाचा पार वाढत आहे. २ एप्रिलपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत राहिली. ४ आणि ५ एप्रिल रोजी तापमान ४२ अंशांंवर पोहोचला तर ६ आणि ९ एप्रिल रोजी तापमान ४३ अंशावर पोहोचले. त्यानंतर तापमान अद्याप ४२ अंशावर स्थिरावल्याने शहराचेही तापमान वाढले आहे. अनेकदा वाढते पित्त, ताप, टायफाॅइड, उलटी, जुलाबसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
आता ५०० कप विक्री
शहरात लाखो कप चहाची दररोज विक्री होते. वाढत्या तापमानामुळे बहुतांश कॅन्टीनवरची चहा विक्री ही हजार कपाच्या ठिकाणी आता ५०० कपावर आली आहे. सर्वसामान्य सकाळ आणि सायंकाळचा चहादेखील बाहेर ऐवजी घरातच घेणे अनेकांनी पसंत केले आहे.
वातावरणात उष्णता वाढत असल्याने चहा पिण्याचे प्रमाण पूर्णतः नव्हे तर काहीअंशी कमी झाले आहे. घाम मोठ्या प्रमाणात येतोय. वाढते पित्त, उलटी, जुलाबामुळे पोट बिघडत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने चहा पिण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे.
- प्रज्ञा गायकवाड
चहा विक्रेते
शहरात चहा शौकिनांची संख्या लाखावर आहे. विविध फ्लेव्हरच्या चहा प्रकारात भर पडत असताना वाढत्या उन्हामुळे थंड पेयाकडे, दुग्धजन्य पदार्थ व फळांकडे सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. तसेच दूध आणि चहा पावडरसह गॅसचे दर वाढल्याने आता जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवत नाही. ग्राहकसंख्या पाहून चहा बनवतो.
- सुधाकर कोरे
चहा विक्रेते